20 January 2020

News Flash

सर्वसामान्यांचे पैसे कोणाच्या खिशात गेले? – राज ठाकरे

भाजपा हे ३७० कलम, पुलावामा हल्ला अशा भावनिक मुद्दय़ांवर प्रचार करत असल्याचे ते म्हणाले

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पीएमसी बँक घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली. सर्वसामान्यांचा आयुष्यभराचा पैसा कोणाच्या खिशात गेला, असा प्रश्न त्यांनी मालाड, मागाठाणे येथील सभांमध्ये उपस्थित केला. बँक घोटाळ्यांची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी या वेळी केला.

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरे यांनी रविवार दिवसभरातील सभांमधून भाजपा-सेनेला अनेक निर्णयांवरून धारेवर धरले. बँकांतील घोटाळे, बुलेट ट्रेन, ३७० कलमांचा भावनिक मुद्दा, वेगळ्या विदर्भाचे राजकारण आणि मुंबईच्या अस्तित्वाचा प्रश्न अशा मुद्दय़ांवर हल्ला चढवला.

भाजपा हे ३७० कलम, पुलावामा हल्ला अशा भावनिक मुद्दय़ांवर प्रचार करत असल्याचे ते म्हणाले. कामाच्या आधारावर नाही तर भावनेच्या आधारावर मतदान केले जाते, अशी खंत त्यांनी मांडली.

शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण करण्यापेक्षा महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असणाऱ्या गड-किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे ते म्हणाले. आरेमधील झाडे तोडण्याच्या मुद्दय़ावरून त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढविला. आमचे सरकार आल्यावर आम्ही तेथे जंगल घोषित करू, असे शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात. मग काय तेथे गवत लावणार का, असा सवाल त्यांनी केला.

वेगळा विदर्भ आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या राजकारणावरदेखील त्यांनी थेट हल्ला चढवला. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईच्या अस्तित्वाला धक्का लावण्याचे षड्यंत्र असल्याचे ते या वेळी म्हणाले.

First Published on October 14, 2019 1:46 am

Web Title: money in general went into someones pocket says raj thackeray
Next Stories
1 प्रचाराचा रविवार
2 दोन आठवडय़ांत लोकलमधून पडून १० जणांचा मृत्यू
3 आरेमधील संवेदनशील क्षेत्रातून १६५ हेक्टर वगळण्याचे स्पष्टीकरण द्या!
Just Now!
X