हिंदुत्वाच्या मुद्यावर जवळपास तीन दशक चाललेली भाजपा आणि शिवसेना युती शिवसेनेच्या सत्तेसाठी हपापलेल्या भूमिकेमुळे अखेर तुटली असं म्हणत नागपूर तरूण भारतमधून शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे. तसंच युतीत शिवसेनेची अवस्था भांडखोर जोडीदारासारखी झाली आहे. शिवसेनेनं यापूर्वी कधी समंजसपणा दाखवला नाही. राज्यातील जनतेच्या व्यापक हितासाठी भाजपा समजून घेत, संयमाने वागत असतांना शिवसेनेने मात्र टोकाची भूमिका घेतली आहे. आपण सत्तेसाठी किती हपापालेलो आहे, हे शिवसेना आपल्या वागणुकीतून दाखवून दिले असल्याचं म्हणतं शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली होती. या प्रकारावरही नागपूर तरूण भारतच्या संपादकीय मधून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर भारतात कुठल्याच राज्यांत राजकारण इतक्या शिवराळ स्तराला जावून कुणी करत नाही. बाळासाहेबांचे समाधीस्थळ हे काही राजकारण करण्याचे ठिकाण नाही अन्‌ त्यांच्या वियोगाचा तो स्मृती दिवस काही तुमच्या सत्तालोभाची खदखद काढण्याचा दिवस नक्कीच नाही. ती महाराष्ट्राची राजकीय परंपराही नाही. अर्थात शिवसेनेकडून इतक्या सभ्यतेची अपेक्षाही नाही. उलट त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं स्वागत आपला मित्र म्हणून नव्हे तरीही एक बडा नेता, माजी मुख्यमंत्री म्हणून सन्मानाने केलं असतं तर ते आश्चर्याचं ठरलं असतं, असं म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

हातचं सोडून पळत्याच्या मागे
शिवसेनेने भाजपासोबतची युती आपल्या आततायी भूमिकेमुळे तोडली आहे. शिवसेना हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागली आहे. यात भाजपाचे तात्कालिक नुकसान दिसत असले तरी दीर्घकालिन फायदा आहे. शिवसेनेचा मात्र, दीर्घकालिन नुकसान आहे. भाजपाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. प्रेमात ज्याप्रमाणे व्यक्ती आंधळी होऊन जाते, त्याप्रमाणे राजकारणातही आंधळी होत असल्याचे शिवसेनेनं आपल्या भूमिकेतून दाखवून दिलं आहे, असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

शिवसेनेची स्थिती पळून गेलेल्या मुलीसारखी
शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थानाला तसेच प्रतिष्ठेला कोणत्याही प्रकारे साजेसे नसलेल्या मुलासोबत लग्नासाठी पळून जाणार्‍या मुलीसारखी शिवसेनेची भूमिका आहे. घरुन पळून तर गेलो, पण मुलगा आता लग्न न करता नुसताच फिरवतो, आहे, अशी स्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची केली आहे. यामुळे शिवसेनेची स्थिती उद्या गाढव आणि ब्रह्मचर्य दोन्ही गेले, अशी झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असं म्हणत अग्रलेखातून शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेची अवस्था भ्रमिष्टासारखी
शिवसेनेने आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यामुळे त्याची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली आहे. आपण काय करतो, याचे भान त्याला राहिले नाही. आपल्या चुकीचे खापर दुसर्‍यावर फोडण्यात तो दंग आहे. भाजपासारखा मित्रपक्ष गमावून आपण केवढी मोठी चूक केली, हे जेव्हा शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजेल, तेव्हा वेळ निघून गेलेली असणार आहे. आपल्या या चुकीची किंमत शिवसेनेला आयुष्यभर मोजावी लागणार आहे, असं म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे.