सध्याची परिस्थिती सर्वांना माहिती आहे, आज मी फडणवीस यांना भेटलो, यानंतर त्यांनी सत्ता स्थापनेसाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहणार आहे. मला अशी अशा आहे की लवकरात लवकर भाजपा सत्ता स्थापन करेन. आता  मी भाजपाचा आहे, सत्ता स्थापनेसाठी जे जे काही करता येईल ते मी करणार आहे. भाजपाला मी सर्वोतोपरी मदत करणार आहे. हे माझे कर्तव्य आहे कारण त्या पक्षाचा मी एक सदस्य आहे, असे नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक बैठक पार पडल्या त्याप्रमाणे आजही झाली. त्यांच्याकडून सत्तास्थापनेला विलंब होत आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकेल असं मला वाटत नाही, असेही राणेंनी यावेळी सांगितले. तसेच,  सत्तास्थापनेस विलंब होणे योग्य नाही, जनतेची ज्याला काळजी आहे, ज्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं सांगितलं आहे, शेतकऱ्यांना भेटूनही आले. मात्र सरकार बनवायला कुठलेही सहकार्य नाही. ज्यांच्यामुळे विलंब होतोय तेच या सर्व परिस्थितीला जबाबदार आहेत. निवडणुकी अगोदर युती झालेली आहे १६० पेक्षा जास्त जागा निवडूण आलेल्या होत्या, मात्र तरी देखील वेगळा मार्ग निवडणे हे नैतिकतेला धरून नाही.  काँग्रेस -राष्ट्रवादीच्या केवळ बैठका होत आहेत, मात्र त्यात कोणताही निर्णय होत नाही. शिवसेनेला उल्लु बनवले जात असल्याचेही राणे यांनीा म्हटले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी  व शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र पत्रकारपरिषद घेऊन राज्यातील सत्ता स्थापनेच्यादृष्टीने पक्षाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.

या अगोदर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेने आम्हाला पहिल्यांदाच पाठिंबा मिळण्यासंदर्भात अधिकृत संपर्क साधला. दोन्ही पक्ष यावर विचार करुन योग्य तो निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. तर भाजपा सरकार हे मनमानी करणारं सरकार आहे अशी टीका अहमद पटेल यांनी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. राज्यपालांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं मात्र काँग्रेसला दिलं नाही यावरही अहमद पटेल यांनी टीका केली.