मंगळवारी संध्याकाळी द रिट्रिट हॉटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबतच जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर भाजपाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर टाकली आहे असा दावा केला. मात्र त्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार स्थापनेचा नारायण राणेंचा दावा फेटाळला. मात्र राणे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना एका महिला पत्रकाराने अगदीच खोचक प्रश्न विचारला. या प्रश्नावर राणेंनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

उद्धव यांच्या पत्रकार परिषदेनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राणेंनी “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नीती अजूनही उद्धव ठाकरेंना कळली नाही का? हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला उल्लू बनवत आहेत. भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे. जेव्हा भाजपा राज्यपालांकडे जाईल तेव्हा १४५ आमदारांची यादी हातात घेऊन जाईल आणि सत्ता स्थापन करेल रिकाम्या हाती आम्ही जाणार नाही,” असा विश्वास राणेंनी व्यक्त केला. मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अचानक राणेंच्या उजवीकडे उभ्या असणाऱ्या एका महिला पत्रकाराने त्यांना खोचक प्रश्न विचारला. “नारायण राणे ज्या पक्षामध्ये जातात त्या पक्षाची सत्ता जाते, अशी टीका होते,” असा प्रश्न एका महिला पत्रकाराने विचारला. यानंतर राणेंनी तिच्याकडे हसून पाहत ‘सत्ता जात नाही येते,’ असं उत्तर दिलं.

 

नक्की वाचा >> ‘उद्धव ठाकरेंचं राणेंबद्दलच ते भाकित खरं ठरलं’; नेटकऱ्यांकडून ट्रोल

उद्धव यांनी केली होती टीका

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काँग्रेसची सत्ता आल्यास नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना पुन्हा विरोधीपक्षात बसावे लागणार असण्यावरुन राणे परिवाराला ट्रोल केले जात आहे. अनेकांना यावरुनच उद्धव ठाकरेंनी १६ ऑक्टोबरच्या कणकवलीच्या सभेत केलेली टीकाही आठवली आहे. ‘नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लागते. त्यांनी काँग्रेसची विल्हेवाट लावली आणि आता ते भाजपात गेले आहेत. राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल माझ्याकडून भाजपला शुभेच्छा’, असा टोलाच उद्धव यांनी कणकवलीच्या सभेत लगावला होता. ‘मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत बसणे शक्य नाही. मी येथे टीका करण्यासाठी आलो नाही तर भाजपला सावध करण्यासाठी आलो आहे,’ असंही उद्धव यावेळी म्हणाले होते.