“बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवसेना शिवसेना होती. मात्र आता शिवसेनेच्या आमदारांममध्ये वैचारिक नीतीमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत” असा आरोप नारायण राणे यांनी पुण्यात केला. “पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येतं हे आता शिवसैनिकांना माहित झालं आहे. त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता वाघ राहिला नाही, त्यांच्या शेळ्या मेंढ्या झाल्या आहेत” अशीही बोचरी टीका नारायण राणे यांनी केली.
” माझ्या भाजपा प्रवेशासाठी शिवसेनाच आडकाठी करत आहे ” असाही आरोप नारायण राणे यांनी केला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये युवर्स ट्रुली राणे या कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. नारायण राणे यांनी नुकत्याच लिहिलेल्या झंझावात या आत्मचरित्राच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेशी आलेला संबंध, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत झालेली भेट, कौटुंबिक पार्श्वभूमी, मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द, शिवसेनेला दिलेली सोडचिठ्ठी या सगळ्या विषयांवर भाष्य केलं.
“शिवसेनेत आम्ही जेवढी आंदोलनं केली तेवढी उद्धव ठाकरे यांना माहितीही नाहीत. आत्ताची शिवसेना व्यावसायिक झाली आहे. शिवसेनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीत मी सर्वाधिक लोकप्रिय होतो. अपवाद फक्त उद्धव ठाकरे यांचाच होता. त्यांना चांगले दिसत नाही आणि चांगल्या व्यक्तीचे कौतुकही करवत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून दूर गेल्याचा त्रास मला आजही होतो. माझ्या कामाची पद्धत पाहून मनोहर जोशी आणि सुभाष देसाई यांनी माझ्याविरोधात कारस्थानं केली. उद्धव ठाकरे सोडल्यास सर्वपक्षीयांशी माझे चांगले संबंध आहेत. काँग्रेसमध्ये पक्षासाठी काम करावं अशी नीतीमत्ता उरलेली नाही” अशीही टीका नारायण राणे यांनी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2019 7:54 pm