सावंतवाडी : नारायण राणे यांच्याशी माझा वैयक्तिक लढा नाही तर त्यांच्या दडपशाही प्रवृत्तीविरोधात राहिला आहे, मात्र आज नारायण राणे हे योग्य पक्षात गेले आहेत, संघाची विचारधारा व तत्त्वज्ञान त्यांनी आचरणात आणून आपल्यात बदल घडविल्यास त्यांचे आणि माझे वैर संपेल असे शिवसेना उमेदवार पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.

भाजपात बंडखोरी करून माझ्या विरोधात रिंगणात उभे असलेले अपक्ष उमेदवार राजन तेलींची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्याची माहितीही आपल्याला मिळाल्याचे केसरकर म्हणाले येत्या दोन दिवसांत भाजपचे कार्यकर्ते युतीच्या प्रचारात दिसतील असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.

या वेळी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब उपस्थित होते.

या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे याच्या खांद्यला खांदा लावून काम करण्याच्या नितेश राणे यांनी दर्शविलेल्या सहमतीवरून राणेच्या पुत्रामध्ये दिसून आलेल्या मतभेदाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, तो त्याच्या कुटुंबामधला वैयक्तिक वाद आहे, कोणाच्या कुंटुंबात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांपैकी मी राजकारणी नाही ते एक कुटुंब असुन ते कुंटुंबच राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

मात्र राणेशी माझा वैयक्तिक कोणताही वाद नाही माझा वाद राहिला तो त्याच्या प्रवृत्तीशी त्याच्या विचारधारे विरोधात आहे त्यांची काम करण्याची पद्धत राहिली आहे त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिसांचार निर्माण केला आहे. त्यामुळे माझा लढा या प्रवृत्तीविरोधात राहिला आहे.

त्यामुळे राणे कुंटुंबीयांमध्ये जर वाद असतील तर जिल्ह्य़ाचा पालकमंत्री म्हणून मी कधीही घेणार नाही,  राणेंनी ज्याप्रमाणे सांगितले की, मुख्यमंत्री सांगतील तसा वागेन, त्याप्रमाणे त्यांनी आपली काम करण्याची पद्धत बदलली, या जिल्ह्य़ात कोणाला मारहाण झाली नाही तर आमचे वैरही कमी होईल, असे ते म्हणाले.

तसेच राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांवर केलेल्या टीकेची जाहीर माफी मागितल्यास शिवसेना व राणे यांच्यातील वाद मिटेल, असे केसरकर म्हणाले.

नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाला याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, नियतीने खेळलेला हा डाव असून, ज्यांनी इतरांचे पक्ष विलीन करण्याची भाषा केली त्यांनाच आज आपला पक्ष विलीन करण्याची वेळ आली. त्यांना भाजपप्रवेशासाठी सहा महिने तारख्या घ्याव्या लागल्या. केवळ मुख्यमंत्र्यांनी अभय दिले म्हणून त्याचा भाजपप्रवेश झाला, भाजपच्या शिस्तीचे पालन करणे हे राणेंचे कर्तव्य आहे आणि ते जरी केले तरी जिल्हातील पूर्वीचे प्रकार बंद होतील, भाजपच्या कमळावर उभे न राहता राजन तेली यांनी ज्याप्रमाणे आपल्या प्रत्रकावर मोदींचे फोटो वापरले ते पाहता त्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यास ती सगळी पत्रके बदलावी लागणार आहे. अन्यथा निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होणार आहे, व तसे न केल्यास त्यांच्यावर मी कारवाईची मागणी करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, मला नारायण राणेंमुळे आमदारकी मिळाली नाही,मला मतदारसंघांतील जनतेने आमदार बनविले आहे आणि सावंतवाडीला पाच वेळा निवडून आलेल्या श्रीमंत शिवराम राजेसारख्या  सज्जन व्यक्तीने या आमदारकीची खुर्ची भुषविली आहे. त्यामुळे अशा प्रवित्र खुर्चीवर डाग लागलेल्या लोकांना बसण्याचा अधिकार नाही. तो अधिकार येत्या निवडणुकीत कोणाला द्ययचा हे लोकांच्या हाती असून ते योग्य निर्णय घेतील, असे केसरकर म्हणाले.