शिवसेनेला कोकणात मी आणलं, पण पुढच्या वेळी कोकणात दोन्ही खासदार भाजपाचे असतील असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. “येत्या आठ दिवसांत आपण भाजपात प्रवेश करणार,” असल्याचंही यावेळी नारायण राणे यांनी सांगितलं आहे. भाजपात प्रवेश करण्यासंबंधी आपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचा दावाही नारायण राणे यांच्याकडून करण्यात आला आहे. सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत भाजपामध्ये जाण्याबाबत कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यासोबत राहणार असल्याचाही दावा यावेळी नारायण राणे यांच्याकडून कऱण्यात आला आहे. तसंच येत्या आठ दिवसात भाजपामध्ये प्रवेश होईल असं त्यांनी सांगितलं आहे.

“जेव्हा मी शिवसेना पक्ष सोडला तेव्हा माझ्यासोबत कार्यकर्तेही काँग्रेस पक्षात आले होते. त्यामुळे भाजपात जाईन तेव्हाही ते माझ्यासोबत असतील,” असं नारायण राणेंनी सागितलं आहे. तसंच भाजपात प्रवेश केल्यानंतर कोकणात पक्ष वाढवण्याचं काम आपण करु असं त्यांनी म्हटलं आहे. “सध्या दोन्ही जिल्ह्यात भाजपचे खासदार, आमदार नाहीत. आता यावेळेला भाजपने प्रवेश दिल्यास पुढच्या वेळी ते भाजपचेच दिसतील, असा विश्वास मी देतो,” असं राणेंनी सांगितलं आहे. .