नारायण राणे यांचा सवाल

सावंतवाडी : गेली पाच वर्षे तुम्ही सत्तेत सहभागी आहात. सिंधुदुर्गातही तुमचे आमदार-खासदार आहेत. मग या जिल्ह्य़ासाठी काय केले ते का सांगितले नाही. मुळात कोकणच्या विकासात उद्धव ठाकरेंचे योगदान काय, असा सवाल माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी गुरुवारी कणकवलीत आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी राणे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर जाहीर प्रतिक्रिया देण्याचे राणे यांनी टाळले असले, तरी ‘प्रहार’ या त्यांच्या मुखपत्राच्या ऑनलाइनवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कार्यकर्त्यांच्या बैठकीत राणे यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘‘शिवसेना पक्षप्रमुख येथे आले. सिंधुदुर्गात दोन सभा घेतल्या. मात्र कोकणी माणसाला काय सांगितले? कोणते व्हिजन दिले? कोणती विकास कामे सांगितली? सतरा मिनिटांच्या भाषणात पंधरा मिनिटे केवळ नारायण राणेवरच बोलले. मी मागील पंचवीस वर्षांत सिंधुदुर्गच्या विकासासाठी जी कामे केली ती जरी सांगितली असती, तरी चार तास लागले असते’’, असे राणे म्हणाले.

शिवसेना माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहे. हिम्मत असेल तर माझ्या कार्यपद्धतीवर, माझ्या व्हिजनवर टीका करा. ते नाही जमणार. पालकमंत्री केसरकर यांनी मंत्रिपदाचा वापर राणेवर टीका करण्यासाठी केला. माझ्यावर टीका करून हे उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले वजन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही गेली दहा वर्षे आमदार आहात. पाच वर्षे राज्यमंत्री आहात. कोणता विकास केला? निदान मी आणलेले प्रकल्प पूर्ण केले का, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

माझ्यावरील टीकेचा समाचार मी घेणार आहे. वाटल्यास ‘मातोश्री’च्या समोर जाऊन घेईन. मात्र निवडणुकीनंतर, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.