केंद्रात नरेंद्र मोदी यांना जिंकून देण्यात व राज्यात देवेंद्र फडणवीस यांन जिंकून देण्यातही महिलांचा वाटा मोठा आहे आणि यावेळीही तो राहील, असा दावा भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

राज्यात देवेंद्र फडणवीसांनी महिलांसाठी उत्कृष्ट काम केले. भाजपचे सरकार येण्याआधी केवळ पाच लाख कुटुंब बचतगटाशी जोडले गेले होते. आता ५० लाखाहून अधिक कुटुंब जोडली गेली आहेत. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शाळेतच सॅनिटरी नॅपकीन मिळण्याची सोय करून दिली. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला. एवढेच नाही तर विद्यार्थिनींच्या उपस्थितीवरही त्याचा परिणाम झाला.

दरम्यान, राज्यातील आदिवासी महिला अजूनही सोयीसुविधांपासून वंचित असल्याचे विचारल्यावर, आदिवासी भाग दुर्गम असल्याने त्या भागात विकास झाला नाही. मात्र, त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणावे लागेल. ग्रामीण भागातील महिलांसोबतच आदिवासी महिलाही तेवढय़ाच महत्त्वाच्या आहेत, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात २२० पेक्षाही अधिक जागा जिंकू आणि नारी शक्तीच त्या जिंकून देतील, असेही रहाटकर म्हणाल्या. यावेळी माजी महापौर व प्रवक्ता अर्चना डेहनकर, शहर अध्यक्ष कीर्तीदा उपस्थित होत्या.