पुण्यातील कोथरूड येथे महायुतीविरोधात मनसेच्या उमेदवारास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा दिल्याच्या पाश्र्वभूमीवर नाशिक शहरातही मनसे आणि आघाडीत तडजोड करण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघात मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक माघार घेऊन आघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना, तर नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार हेमलता पाटील या माघार घेऊन मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे.

मनसेने नाशिक पूर्वमध्ये माजी महापौर अशोक मुर्तडक यांना उमेदवारी दिली आहे. सानप आणि मुर्तडक एकाच समाजाचे असल्याने मतविभागणीचे संकट दोघांपुढे आहे. त्यामुळे मुर्तडक यांनी माघार घ्यावी, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीकडून आमदार देवयानी फरांदे या उमेदवार आहेत. फरांदे यांच्या विरोधातील मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेसने माघार घेऊन मनसेला पाठिंबा देण्याची व्यूहरचना आखण्यात येत असल्याची चर्चा आहे.

स्थानिक पातळीवर अशा प्रकारची कोणतीच चर्चा सुरू नसून, तसा अधिकारही स्थानिक पदाधिकाऱ्यांना नाही. परंतु, वरिष्ठ पातळीवर तशी चर्चा सुरू असेल तर माहिती नाही.

– रंजन ठाकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष.