पश्चिम महाराष्ट्रात आजवर राष्ट्रवादी जिंकत होती. आता मात्र राष्ट्रवाद जिंकणार आहे. कारण, देशात व राज्यात जे बोलले ते करून दाखवणारे सरकार आहे. आम्ही राजकारण वा प्रचार करायला नव्हे तर जनसेवेसाठी सदैव हजर असतो. शिवसेनेचा वचननामा हा शाळकरी मुलं, महिला, शेतकरी, तरूणवर्ग तसेच सर्वसामान्यांच्या गरजांची पुर्तता करणारा असल्याचे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

विधानसभेच्या पाटण मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ मल्हारपेठ (ता.पाटण) येथे आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. आता, जनतेने केलाय निर्धार शंभूराज पुन्हा होणार आमदार असा ठाम विश्वास व्यक्त करून आदित्य ठाकरे म्हणाले, की शंभूराज देसाई हे कर्तव्यदक्ष आमदार आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात भरभरून विकासकामे केली आहेत. त्यामुळे आपण खरंच प्रचाराला येण्याची गरज आहे का? असे शंभूराज यांना विचारलं होतं. आजचे हे वातावरण पाहता शंभूराज मोठं मताधिक्य घेऊन जिंकतील असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

आमदार शंभूराज यांनी १५ मिनिटे न थांबता विकासकामांची यादी तोंडपाठ सांगितल्याने उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला. उद्धव ठाकरेंचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला व पाटण तालुक्याला भरभरून निधी मिळाला. आपल्याकडून पाटण मतदारसंघाचा सकारात्मक असा चेहरा मोहरा बदलण्याचे काम झाले असल्याचे समाधान व्यक्त करताना माझ्या इतकेच मताधिक्य उदयनराजेंना द्या असे आवाहन यावेळी शंभूराज यांनी केले.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, की जिकडे उदयनराजे भोसले  तिकडे जिल्ह्यची सत्ता असते. विकासकामांचे जाळे निर्माण करणारे शंभूराज हे गतिमान नेतृत्व आहे. त्यांना गत निवडणुकीत जनतेने १८ हजारांचे मताधिक्य दिलं अन् शंभूराज यांनी जनतेला आठराशे कोटींचा निधी मिळवून दिला.

लोकसभेच्या सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार उदयनराजे भोसले म्हणाले की, काँग्रेस सरकारमध्ये अहंकार होता. त्यांनी अनेक पिढय़ा विकासापासून वंचित ठेवल्या. माजी मुख्यमंत्र्यांच्या एका सहीअभावी जिल्ह्यचा विकास खोळंबला. त्यांनी प्रत्येकवेळी जागेचा प्रश्न दाखवून सही दिली नाही. काँग्रेस आघाडीचे उमेदवार उमेदीच्या काळात काही करू शकले नाहीत. आता, ते या वयात काय करणार असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांकडून अपेक्षा व्यक्त करून त्यांच्यावर अन्याय करायचा नाही. अशी, उपरोधिक टीका उदयनराजे यांनी श्रीनिवास पाटील यांच्यावर केली. प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांनी केले. युवासेना जिल्हाप्रमुख रणजित भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती विक्रमबाबा पाटणकर यांची सभेला प्रमुख उपस्थिती होती.