नवी मुंबई पोलिसांकडून कळंबोलीमध्ये धरपकड

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खारघर येथील सभेपूर्वी बुधवारी पोलिसांनी धरपकड केली. मोदींच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही कारवाई झालेल्यांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणाऱ्यांचा समावेश आहे.

खारघर परिसरातील अनेक गृहनिर्माण संस्थांनी पाणीप्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत इमारतीच्या प्रवेशद्वारावर ‘पाणी नाही तर, मतदान नाही’ असे निषेधाचे फलक लावले होते. समाजमाध्यमांवरूनही मतदानावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात मोहीम चालवण्यात येत आहे. खारघर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पाश्र्वभूमीवर येथील नागरिकांनी पंतप्रधानांपर्यंत आपले प्रश्न पोहोचवण्याचे प्रयत्न चालवले होते. मात्र, बुधवारी सकाळपासून नवी मुंबई पोलिसांनी या परिसरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये कारवाई सुरू केली. ज्या सोसायटय़ांच्या बाहेर फलक लावण्यात आले आहेत, तेथे जाऊन पोलीस गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करताना दिसत होते.

कळंबोलीमध्ये मात्र पोलिसांनी रोडपाली येथील स्प्रिंग सोसायटीमध्ये हितेश सोलंकी, विकी सोलंकी, रवींद्रनाथ रणदिवे, शंकर नायर, गिरीश जोशी यांना ताब्यात घेतले. तर कळंबोली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक सिंग यांनाही ताब्यात घेण्यात आले. सिंग यांना ताब्यात घेताच त्यांच्या वकिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन या धरपकडीचे कारण विचारले असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांनी त्यांचा जबाब लिहून त्यांना सोडून दिले. मात्र, स्प्रिंग सोसायटीतून ताब्यात घेण्यात आलेल्यांना बुधवारी सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.

निषेधाचे कारण.

खारघर परिसरातील वसाहतींमध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सिडको आणि पनवेल महापालिकेकडून पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याने येथील वसाहतींमधील अनेक गृहनिर्माण संस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे केले होते. निवडणुकीत ‘नोटा’ला मतदान करणार असल्याचे फलकही येथे लावण्यात आले आहेत.

कोणाला ताब्यात घेतले याबाबत मला माहिती नाही. मात्र, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काहीजणांना नोटिसा देण्यात आल्या. ही कारवाई कायद्यानुसार करण्यात आली आहे. बुधवारी राजकीय पक्षाच्या जाहीर सभेत गोंधळ घालण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटिसा देण्यात आल्या होत्या.

– संजय कुमार, पोलीस आयुक्त, नवी मुंबई