सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलायचे कमी झाले असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. तपास यंत्रणांचा सरकारकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. बारामतीमधील सोमेश्वर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“राज ठाकरे लोकसभेला किती बोलायचे. ईडीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना बसवलं. काय झालं कुणास ठाऊक…एकदम बोलायचे कमी झाले. त्याचा आवाज फारच मंदावला आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर उपस्थित हसू लागताच हे थट्टा मस्करी म्हणून सांगत नाही, हे तथ्य आहे असंही त्यांनी सांगितलं. “ईडीच्या प्रश्नांना राज ठाकरेंनी काय उत्तरे दिली हे अजूनही गुलदस्त्यात असल्याचं,” यावेळी त्यांनी सांगितलं.

२२ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तब्बल नऊ तास चौकशी केली. आयएल अ‍ॅण्ड एफएस या खासगी वित्तीय पायाभूत संस्थेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार, अनियमिततेत ठाकरे यांचा सहभाग आहे का, हे तपासण्यासाठी ईडीने त्यांना नोटीस बजावली होती.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी, बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर हे भागीदार असलेल्या कंपनीने कोहिनूर गिरणीचा भूखंड ४२१ कोटी रुपयांना विकत घेतला होता. तेथील विकास प्रकल्पासाठी आयएलएफएस संस्थेकडून सुरुवातीच्या काळात कर्ज घेण्यात आले होते. जोशी, शिरोडकर यांच्यासोबत ठाकरे हेही या प्रकल्पात भागीदार होते. मात्र २००८च्या सुमारास ते या प्रकल्पातून बाहेर पडले. त्याच वेळी आयएलएफएस संस्थेने प्रकल्पात २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याच गुंतागुंतीच्या व्यवहारांमध्ये अनियमितता झाली, असा आरोप आहे. गेल्या काही दिवसांत ईडीने जोशी, शिरोडकर यांचीही चौकशी केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ तासांच्या चौकशीत ईडी अधिकाऱ्यांनी ठाकरे यांचा जबाब नोंदवून घेतला. भूखंड खरेदी, खासगी संस्थेकडून घेतलेले कर्ज, माघार, खासगी संस्थेची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष मिळालेला फायदा आदी व्यवहारांबाबत ईडीने ठाकरे यांना प्रश्न विचारले.