राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. दरम्यान, या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नसून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. अजित पवार यांच्यासोबत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता किंवा आमदार उपस्थित नव्हता. यावेळी त्यांच्यासोबच केवळ त्यांचा मुलगा पार्थ पवार ही एकच व्यक्ती उपस्थित होती.

शनिवारी सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. सकाळी ८ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, एका रात्रीत अशी कोणती गोष्ट घडली त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन सरकार स्थापन केलं, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे, असं स्टेटस सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलं आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये आता फुट पडल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी जे काही केलं त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार म्हणाले होते. दरम्यान, आपणही यापासून अनभिज्ञ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.