राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. यावर अजित पवार यांनी खुलासा करत सोशल मीडियाचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जात असल्याची खंत व्यक्त केली. “व्हिडीओमधील तेवढाच भाग व्हायरल करून बघा शरद पवार हे कसं करतात अस सांगितलं जातं आहे. शरद पवार यांना जनता अनेक वर्षांपासून ओळखते. हेच अजित पवारने केले असते तर हो ते आहेत तसे असं म्हणत लोकांनी विश्वास ठेवला असता,” असं म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी युती सरकारवर सडकून टीका देखील अजित पवार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांनी म्हटलं की, “सोशल मीडियाचा वेगळ्या पद्धतीने वापर केला जात आहे. शरद पवार यांना हार घालत असताना त्यात एकाने डोकावण्याचा प्रयत्न केला असता त्याला कोपऱ्याने बाहेर ढकलले. शरद पवार हे कसं करतात बघा अस व्हिडिओद्वारे सांगितले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील जनता १९८४ पासून साहेबांना ओळखते. अजित पवार यांनी तसं केलं असत तर हो ते आहेत तसे असं म्हटलं असतं,” असं म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.

हे सरकार पोटावर लाथ मारणारे आहे अशी टीका देखील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केली आहे. “४५ वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काय दिवे लावले, काय प्रश्न सोडवले,” असा सवाल यावेळी अजित पवार यांनी केला.

“राज्यात अस्वस्थता वाढली असून प्रचंड बेकारी वाढली आहे. विरोधक नसतील तर देशाच्या पंतप्रधानांना सभेच्या निमित्ताने यावं लागलं नसतं. जर विरोधक नगण्य असते तर मुख्यमंत्र्यांना सभा घ्याव्या लागल्या नसत्या,” अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. यावेळी अजित पवार यांनी एका रुपयात आरोग्य तपासणी या शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील योजनेची खिल्ली उडवत एक रुपयात चहा देखील येत नाही असा टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar on viral video of sharad pawar maharashtra assembly election sgy
First published on: 14-10-2019 at 18:34 IST