मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचं उत्तर त्यांनी दिलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त करत आपल्यासंबंधी अनेक चुकीच्या बातम्या देण्यात आल्याची खंत बोलून दाखवली. मला जास्त काहीही बोलायचं नाही सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. अजित पवार यांनी मंगळवारी रात्री सिल्व्हर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यासंबंधी विचारण्यात आलं असता, शरद पवार आपले नेते आहेत म्हणूनच भेटायला गेला होतो असं त्यांनी सांगितलं.

शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत अजित पवार यांनी सगळ्या महाराष्ट्राला धक्का दिला होता. कारण भाजपासोबत जात त्यांनी ही शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधला आमदारांचा एक मोठा गट फोडला असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र त्यांच्यासोबत जाणारे सगळे आमदार रविवारी संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीमध्ये परतले. अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्नही सुरु होते. अखेर मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्याने भाजपाचं सरकार कोसळलं आणि देवेंद्र फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नऊ तासांनी अजित पवार हे सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी परतले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली.