विधानसभा निवडणुकीचं मतदान सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. मतदानानंतर आता सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलेलं असताना पुण्यासह राज्यात काही उमेदवारांनी मतदान संपल्यानंतर फटाके फोडून जल्लोष केला. निकाला तीन दिवस बाकी असतानाच उमेदवारांनी फटाके फोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर विजयाची घाई झालेल्या उमेदवारांनी फटाके फोडत जल्लोष केला. पुण्यातील शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत. सोमवारी मतदान झाल्यानंतर त्यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी शिरोळे विजयी होणार असल्याचा दावा करत गोखले नगरमध्ये फटाके फोडले.

दुसरीकडे कागलमध्येही विजयाआधी फटाके फोडण्यात आले. राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनीही मतदान संपल्यानंतर विजयी मिरवणूक काढली. यावेळी गुलाल उधळत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दापोलीतून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनीही विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. मात्र, या उमेदवारांनी निकालाआधीच फटाके फोडून गुलाल उधळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

आणखी वाचा- पुणे : चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रावरच दिली किशोर शिंदेंना ऑफर

लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतदान झाल्यानंतर विजयी होणार असल्याचं सांगत फटाके फोडले होते. त्यानंतर निवडणूक निकालातून त्यांचा दावा खरा ठरला होता. तसाच काहीसा निकाल शिवाजी नगर, कागल आणि दापोलीत लागणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दरम्यान, मतदानानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर झाले आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची विजयी घोडदौड कायम राहील. महायुतीला २०० हून जास्त जागा मिळतील, असे अंदाज बहुतेक सर्व खासगी वृत्तवाहिन्या आणि मतदानोत्तर चाचण्या करणाऱ्या संस्थांनी वर्तवले आहेत. भाजप १४० जागांपर्यंत मजल मारून स्वबळावर सरकार स्थापण्यासाठी आवश्यक असलेल्या १४५ आकडय़ाच्या जवळपास पोचेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसे झाल्यास सत्तेच्या सारीपाटावर वेगळ्या चाली खेळल्या जातील. त्याचबरोबर काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. तरीही अपेक्षेप्रमाणेच महायुती बाजी मारेल, असेच मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष आहेत.