बुधवार रात्री उशिरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाकडून २० उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना नांदगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर माढ्यातून बबनदादा शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या या दुसऱ्या यादीत राज्यातील सर्वच भागातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, परभणी, औरंगाबाद, नाशिक, रायगड, पुणे, बीड, सोलापूर, कोल्हापूर या जिल्हांतील उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने काल ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये २० विद्यमान आमदारांचा समावेश होता आणि आजच्या दुसर्‍या यादीत ५ विद्यमान आमदारांचा समावेश करण्यात आला आहे तर १५ नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे – 

जळगाव शहर – अभिषेक पाटील, बाळापूर- संग्राम गावंडे, कारंजा- प्रकाश डहाके, मेळघाट- केळराम काळे, अहेरी- धर्मरावबाबा आत्राम, दिग्रस- तारीक शमी, गंगाखेड- मधूसुदन केंद्रे, कन्नड- संतोष कोल्हे, नांदगाव- पंकज भुजबळ, बागलाण- दिपिका चव्हाण, देवळाली- सरोज अहिरे, कर्जत- सुरेश लाड, खेड आळंदी- दिलीप मोहिते, मावळ- सुनिल शेळके, पिंपरी- सुलक्षणा शिलावंत, आष्टी- बाळासाहेब आजबे, माढा- बबनदादा शिंदे, मोहोळ- यशवंत माने, माळशिरस- उत्तमराव जानकर, चंदगड- राजेश पाटील.