राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंचवड विधानसभेचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज आज बाद झाला आहे. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्याने अर्ज बाद झाला. त्यामुळे चिंचवड विधानसभेत आता आमदार लक्ष्मण जगताप विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राहुल कलाटे यांना छुपा पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघात १९ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले होते. अर्जाची शनिवारी छाननी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादीकडून प्रशांत शितोळे, भाजपा शिवसेना युतीकडून आमदार लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी पक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राहुल कलाटे विरुद्ध आमदार लक्ष्मण जगताप अशी लढत होणार आहे. दरम्यान, अर्ज बाद झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना छुपा पाठिंबा देणार असल्याची चर्चा पिंपरीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे.