परभणीत शरद पवारांची उदयनराजे यांच्यावर टीका

परभणी : छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही राज्य करतो, असे म्हणणारी माणसे ही फसवी आहेत. नाव शिवाजी महाराजांचे घ्यायचे आणि आपला धंदा सुरू करायचा, ही यांची नीती आहे. पुरंदरच्या किल्ल्यावर  मिर्झाराजे जयसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी वाटाघाटी केल्या. दिल्लीला गेल्यानंतर मात्र या रयतेच्या राजाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यानंतर छत्रपती परतले आणि पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले त्यांनी परत मिळवले. पुन्हा रयतेचे राज्य स्थापन केले. याउलट त्यांच्याच कुटुंबातली माणसे दिल्लीत जाऊन गमछा घालून घेण्यात धन्यता मानतात, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता उदयनराजे भोसले यांच्यावर केली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी पवार यांनी संवाद साधला. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री फौजिया खान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, आमदार विजय भांबळे, माजी महापौर प्रताप देशमुख, राजेश विटेकर, प्रदीप सोळंके, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कठोर टीका केली. नाशिक ही कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर बाजारात कोणी कांदा आणायचा नाही, असे सांगण्यात आले. काही कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या, अटक केली. पाकिस्तानातून कांदा आयात केल्याने इथल्या किमती पडल्या, त्यामुळे शेतकरी गाडीवर कांदे फेकतील याची भीती सरकारला होती. आपल्या विरोधात प्रतिक्रिया आली तर कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्याचे काम हे सरकार करते. ज्याच्या मनगटात धमक आहे आणि स्वाभिमान शिल्लक आहे, असा कोणताही माणूस हे सहन करणार नाही असेही पवार या वेळी म्हणाले.

सबंध देशात मंदीची लाट असून शेतमालाच्या किमती कोसळल्या आहेत. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत आणि नोकरभरतीची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी वेगळीच भरती सुरू केली, पण काही माणसे गेली तरी त्याची मला चिंता नाही. १९८० साली ५२ आमदार मला सोडून गेले, पण पुढच्या निवडणुकीत त्यातला एकही निवडून आला नाही. आज काही लोक पक्ष सोडून जातानाही पवारसाहेब आमच्या हृदयात आहेत, असे बोलतात, तेव्हा बाबा तुझे हृदय आहे तरी केवढे? अख्खा शरद पवार त्यात मावतोय, असे पवारांनी म्हणताच एकच हशा पिकला.

पवारांच्या हस्ते लोकार्पणाचा आनंदच

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची संकल्पना आपणच मांडली होती आणि सातत्याने पाठपुरावाही केला. मात्र, आज होत असलेल्या लोकार्पण सोहळ्यात आपल्याला डावलले गेले. काही संकुचित प्रवृत्तीच्या माणसांमुळे आपल्याला बोलावले गेले नाही, त्याबाबत आपली कोणतीही नाराजी असणार नाही. अशा प्रवृत्तींकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. पुतळ्याचे अनावरण शरद पवारांच्या हस्ते व्हावे ही आपली मनीषा मात्र पूर्ण झाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया माजी महापौर प्रताप देशमुख यांनी दिली. २००७ साली नगराध्यक्ष असताना तसा ठराव घेतला. २००८ साली तत्कालीन पालकमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले होते. मात्र, त्या वेळीही काही विघ्नसंतोषी लोकांनी खोडा घातला. त्यानंतर महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर पुन्हा महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा पाठपुरावा केला. स्टेडियमची नियोजित जागा पुतळ्यासाठी प्रस्तावित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून ती पालिकेकडे हस्तगत करण्यात आली. महापौर असताना २० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. त्याच वेळी पुतळ्याचे लोकार्पण पवारांच्या हस्ते व्हावे अशी आपली इच्छा होती ती या निमित्ताने पूर्ण झाली. निमंत्रण पत्रिकेत नाव डावलले तरी आपल्या सर्वोच्च नेत्याच्या उपस्थितीत कार्यक्रम झाल्याने उपस्थित होतो, असेही देशमुख या वेळी म्हणाले.

पक्षाच्या आढाव्यासाठी शरद पवार आज जालन्यात

जालना : विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाचा आढावा आणि कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी संवाद साधणार आहेत. आघाडीमध्ये जिल्ह्य़ातील पाचपैकी घनसावंगी, भोकरदन आणि बदनापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. २००४ मध्ये या तिन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजय झाला होता. सध्या यापैकी एकच म्हणजे घनसावंगी मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजेश टोपे आमदार आहेत.

राजेश टोपे यांनी सलग चार वेळेस विधानसभा निवडणूक लढविलेली असून चारही वेळेस ते विजयी झालेले आहेत. मतदारसंघाच्या पुनर्रचनेपूर्वी १९९९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविली. त्यावेळीही टोपे विजयी झाले होते. २०१४ मध्येही काँग्रेसचा उमेदवार असतानाही टोपे एकूण मतदानापैकी ४६ टक्के मते मिळवून ४३ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले. दोन साखर कारखाने, शिक्षण संस्था, सहकारी बँक याशिवाय अनेक संस्थांवर ताबा असणारे टोपे यांचा मतदारांशी व्यापक संपर्क आहे. परंतु अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र (परभणी लोकसभा) घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार २४ हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर होता. परंतु टोपे समर्थकांना मात्र याबाबत फारशी काळजी वाटत नाही आणि या संदर्भात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगळेपण असते असे सांगून ते २०१४ चे उदाहरण देतात. आता पाचव्यांदा टोपे या मतदारसंघातून उभे राहणार आहेत.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रभाव असलेल्या भोकरदन विधानसभा मतदारसंघात यावेळेस पुन्हा राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे उमेदवार असणार आहेत. सलग तीन वेळेस चंद्रकांत दानवे निवडून आले त्यावेळेस या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजप अशी सरळ लढत झाली होती. २०१४ मध्ये चंद्रकांत दानवे पराभूत झाले आणि त्याला कारण शिवसेना-भाजप युती तुटण्याचे ठरले.

परंतु यावेळेस चंद्रकांत दानवे यांच्यासमोर आव्हान असेल ते राष्ट्रवादी सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांचे. अलीकडेच जाफराबाद भागातील राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे.

बदनापूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षित होण्यापूर्वी २००४  मध्ये तेथून राष्ट्रवादीचे अरविंद चव्हाण विजयी झाले होते. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादीचे सुदाम सदाशिवे या मतदारसंघातून पराभूत झाले. परंतु जवळपास ३७ हजार मते घेऊन त्यांनी जोरदार लढत दिली होती. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांनी जवळपास ५० हजार मते घेतली, परंतु भाजपसमोर त्यांचा पराभव झाला.

अलीकडेच झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील पाचही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपेक्षा शिवसेना-भाजप युतीला मताधिक्य आहे.

या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीला जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघात विरोधकांना सामोरे जायचे आहे.

एकेकाळी तीन, सध्या एकच आमदार

२००४ मध्ये जिल्ह्य़ात पाचपैकी तीन विधानसभा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीचा सध्या जिल्ह्य़ात एक आमदार आहे. डॉ. निसार देशमुख यांना जिल्हाध्यक्ष केले आणि आपणास कार्याध्यक्षही केले नाही म्हणून नाराज झालेले माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी २०१४ मध्ये जालना विधानसभेची निवडणूक भाजपकडून लढविली. पराभव झाला तरी त्यांना जवळपास ३८ हजार मते मिळाली. अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत परतले आहे. २००९ मध्ये ३७ हजारांपेक्षा अधिक मते मिळवून पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार सुदाम सदाशिवे आता वंचित बहुजन आघाडीत आहेत. राष्ट्रवादीचे जाफराबाद तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे जालना शहराध्यक्ष आणि नगरपरिषद उपाध्यक्ष राजेश राऊत यांनी भाजप प्रवेश केला आहे. बदनापूरचे राष्ट्रवादीचे तीन-चार नगरसेवकही यापूर्वीच भाजपमध्ये गेलेले आहेत.