“मी क्रिकेटमध्ये प्रशासक होतो, मी क्रिकेट खेळत नाही,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोला लगावला. “राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधीकधी तुम्हाला वाटतं की तुम्ही मॅच हारत आहात, मात्र निकाल पूर्णपणे वेगळा लागतो,” असं गडकरी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा पवार यांनी समाचार घेतला.

नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “राज्यातील एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. सध्या फॉर्म्युलावरही चर्चा सुरू असून ती प्राथमिक टप्प्यात आहे. ज्यावेळी त्यावर काही ठोस निर्णय होईल, त्यावेळी फॉर्म्युला सर्वासमोर उघड केला जाईल,” असं पवार यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “हारणार असं वाटणारी मॅचही जिंकली जाऊ शकते”

“ज्याची मुख्यमंत्रिपदाची मागणी आहे, त्यावर विचार झाला पाहिजे. स्थिर सरकार यावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत. राज्यात स्थिर सरकारच स्थापन होईल, हे सरकार पाच वर्ष चालेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पुन्हा येणार असं म्हणत टोला लगावला. “मी फडणवीसांना गेल्या काही वर्षांपासून ओळखतो. पण ते ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हे मला आत्ताच कळलं,” असं ते म्हणाले. “राज्यातील जनतेने आज कोणालाही पूर्ण बहुमत दिलं असतं, तर आज चर्चा करण्याची वेळच आली नसती,” असंही त्यांनी नमूद केलं.