राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शनिवारी घेतली. अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे राज्यामध्ये तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अजित पवारांनी दिलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे, हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर रंगलेल्या राजकीय नाट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं. यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांना जाहीर पाठिंबा देत आपली बाजू स्पष्ट केली.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचाही समावेश होता. धनजंय मुंडे यांनी ट्विट करत सांगितलं होतं की, “मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती”.

या ट्विटला १० हजाराहून अधिक लाईक्स असून ८५० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. या ट्विटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. यामध्ये काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. यामध्ये एका समर्थकाने प्रतिक्रिया देताना तुम्ही सुद्धा पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली. तसंच उत्तर तुम्हाला नाही ओ कार्यकर्त्यांना द्यावं लागतं अशी खंतही बोलून दाखवली.

“साहेब मी स्वतः काल तुम्हाला सात ते आठ कॉल केले. तुमचा फोन नॉट रीचेबल लागत होता. किती टेन्शन घेतलं मी कालपासून हे फक्त माझ्या घरच्यांना माहीत. तुम्ही सुद्धा पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेन. कारण उत्तर तुम्हाला नाही ओ कार्यकर्त्यांना द्यावे लागत,” अशी प्रतिक्रिया या समर्थकाने धनंजय मुंडेंच्या ट्विटवर लिहिली आहे.

याचप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत कायम राहण्याची विनंती केली आहे.