छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा शपथवीधीदरम्यान जर उल्लेख झाला तर भाजपाला राग का यावा. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपाला असूया आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला.

उद्धव ठाकरे आज पहिल्यांदा विधीमंडळातील या सभागृहात आले. विरोधी पक्षानं त्यांचा मान राखणं आवश्यक होतं. परंतु तसं झालं नाही, असं पाटील यावेळी म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे आभार मानले. घोडेबाजार वाव न दिल्यामुळे त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले. तसंच पुढील पाच वर्षेही घोडेबाजार होऊ देणार नाही, असा विश्वास असल्याचंही ते म्हणाले.

शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार हंगामा झाल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांची ओळख करून देत असताना भाजपाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी पुन्हा शपथ घेण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी घेतलेली शपथ योग्य नसल्याचंही ते म्हणाले. कामकाजादरम्यान भाजपा आमदारांकडून सभात्याग करण्यात आला. दरम्यान, शपथविधीचा विषय हा राज्यपालांच्या अखत्यारितील विषय असून त्यावर भाष्य करणार नसल्याचं स्पष्टीकरण विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.