राज्यात अद्यापही सत्तास्थापनेचा तिढा कायम असून आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आमदार फुटू नयेत यासाठी एकीकडे काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरला हलवलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना कुठेही नेलेलं नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपात प्रवेश करणारे आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल झालेला एक मेसेज ट्विट करत उदयनराजे भोसलेंना टोला लगावला आहे. ‘शिवसेना आमदार – रंगशारदा, काँग्रेस आमदार – जयपूर, राष्ट्रवादी आमदार – आपआपल्या घरी, कारण सगळ्यांना उदयन राजेंचा फोटो मेसेज करून ठेवलाय. हा मेसेज करणाऱ्याला सलाम’ असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणुकही पार पडली. या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी धक्कादायक पराभव केला. त्यामुळेच बंडखोरी करणाऱ्या आमदारांची परिस्थिती उदयनराजे भोसलेंसारखी होईल असा सांगण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत.

शिवसेना आमदाराला भाजपाने ५० कोटीची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपा आता घोडेबाजार चालवत आहे असंही त्यांनी म्हटलं. फक्त शिवसेनेच्याच तर आमच्याही म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या आमदारालाही ऑफर देण्यात आली असाही आरोप त्यांनी केला आहे. मात्र हिरामण खोसकर या काँग्रेस आमदाराने मला कोणतीही ऑफर आली नाही असं म्हणत विजय वडेट्टीवार यांचा दावा फेटाळला आहे.