निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या उत्तम जानकर यांना माळशीरसमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी वेळारपूरमधूल आपल्या प्रचाराला सुरूवात केली. भाजपाचा सत्तेचा माज उतरवायचा असेल तर आघाडी सरकारच्या हाती सत्ता द्या, असं आवाहन यावेळी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केलं.

यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. “आमच्या हाती सत्ता दिल्यावर तीन महिन्यांमध्ये सात बारा कोरा न केल्यास पवारांची औलाद आहे, असं सांगणार नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले. सरकार शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसेही देत नाही. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे सरकारचे पाप आहे. सरकारला शेतीतलं काही कळत नाही. रोग कोणता आहे हेच त्यांना कळत नाही. ते शेतकऱ्यांना काय मदत करणार,” असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कडकनाथ प्रकरणाचाही उल्लेख केला. “ज्यांना निवडून देण्याचं काम ही जनता करते, तसंच त्यांना पाडण्याचं कामही तिच जनता करते. याचा विचार राज्यकर्त्यांना पडला आहे. ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर पांघरूण घालायचं आणि ज्यांनी काही केलं नाही त्यांना मात्र त्रास देण्याचं काम हे सरकार करत आहे,” असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. “गेले अनेक वर्ष राजीनामे शिवसेनेच्या खिशात आहेत. आता त्यांचं कोणीही ऐकतही नाही आणि ते केवळ नुसतं आम्ही बघून घेतो असं म्हणताना दिसतात,” असंही तपवार यांनी नमूद केलं.