स्वस्तातील जेवण, आरोग्य सुविधेच्या घोषणेवरून अजित पवारांचा प्रश्न

पिंपरी : पुन्हा सत्ता मिळाल्यास दहा रुपयात जेवण आणि एक रुपयात आरोग्य तपासणीची सुविधा देण्याचे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात दिले. त्याची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत बोलताना खिल्ली उडवली. पाच वर्षे सत्तेत असताना ठाकरे झोपले होते का, निवडणुका आल्यावरच त्यांना कसे काय सुचते, असा प्रश्न त्यांनी विचारला. केंद्रात आणि राज्यात सरकार असूनही भाजपने पाच वर्षांत काहीही केले नसून मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

पवार म्हणाले,की भाजपकडून विधानसभा निवडणुकीतही ३७० चा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का?  गेल्या पाच वर्षांत भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकरीविरोधी फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून अधोगतीकडे नेले. शेतीमालाला भाव, कर्जमाफी, नोकरभरती, बेरोजगारी, धनगर आरक्षण अशी कित्येक उदाहरणे देता येतील.

राज्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, अशी परिस्थिती होते आहे. बेकारी वाढत राहिल्यास रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल. मुख्यमंत्र्यांनी अनेक मंत्र्यांना पायउतार केले. काहींची खाती बदलली. खडसे, तावडे, पुरोहित, मेहता यांची तिकिटे कापली. त्याची उत्तरे मात्र मुख्यमंत्र्यांनी दिली नाहीत, असेही ते म्हणाले.