भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे विरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि सध्याच्या मंत्रीमंडळातील उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. एक चारोळी पोस्ट करुन त्यांनी ‘खडसे-तावडेंचा ‘विनोद’ याच भाजपने केला’ अशी टीका केली आहे.

भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये खडसे आणि तावडेंचा समावेश नसल्याचे हाच मुद्दा पकडून मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवरुन टीका केली. ‘बारामतीच्या साहेबांचं बोट धरून मोठा झाला… दिवसाढवळ्या पदासाठी त्याच साहेबांच्या पाया पडून आला… निवडून आला अन् ऋण विसरला… अर्धी खुर्ची मिळताच दीड शहाणा झाला… भाऊ, ही भाजप आहे!,’ अशा चारोळी मुंडे यांनी ट्विट केल्या आहेत. शेवटी त्यांनी खडसे आणि तावडेंना उमेदवारी न मिळण्याचा मुद्द्यावरुन शेलार यांना सूचक इशारा दिला आहे. ‘खडसे-तावडेंचा ‘विनोद’ याच भाजपने केला… कुणी सांगा हो यांना!,’ असं या ट्विटच्या शेवटी म्हणत शेलार यांना टॅग केले आहे.

दरम्यान, भाजपाने खडसे यांचे तिकीट कापले असले तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दुसरीकडे विनोद तावडे यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतरही त्यांनी पक्ष जे काम देईल ते मी करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.