“शिवसेनेसोबत आघाडी करण्यास मुस्लीम समाजाला कोणतीही अडचण नाही. उलट त्यांनी लवकरात लवकर हे सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न आहे. नवं सरकार आल्यावर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहिल हे पहावं लागेल. हे सरकार आल्यावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आणि त्यांच्या संघटना अनेक ठिकाणी मुस्लीमांवर हल्ले करतील. शिवसेना त्या ठिकाणी असताना या गोष्टींचा सामना कसा करणार? याबाबत काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे,” असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हुसैन दलवाई यांनी केलं. मुस्लीमांचं शिक्षण, आरक्षण, त्यांना सामावून घेण्याचा प्रश्न आहे, गृहमंत्रालय कोणाकडे राहिल, असे अनेक प्रश्न सोडवले जाणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.

“नवं समीकरण अस्तित्वात यावं ही माझी गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा आहे. पण काही गोष्टींचं निराकरण होणं, काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मिळणं आवश्यक आहे. अडचणीचे मुद्दे टाळून सरकार स्थापन झालं पाहिजे,” असं मत दलवाई यांनी व्यक्त केलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत माहिती दिली.

“काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मिळणं आवश्यक असल्यानं सत्तास्थापनेच्या चर्चांना अधिक वेळ लागत आहे. याचा अर्थ निर्णय प्रक्रिया लांबवली जातेय असा होत नाही. अखेरच्या काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मिळालं तर लवकरच सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल आणि राज्याला नवं सरकार मिळेल, असा विश्वास दलवाई यांनी व्यक्त केला. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार का? कारखाने बंद पडत चाललेत त्या दिशेने काय होईल, बुलेट ट्रेन बंद झाली पाहिजे, मुंबई केंद्रशासित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते कदापि होऊ देणार नाही, विदर्भ वेगळ करणं अशा गोष्टींना आळा बसणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.