राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. शुक्रवार रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असं वाटत असतानाच अचानक शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीमुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या दोन्ही नेत्यांना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारस शपथ दिली. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर ‘अजित पवारांनी दिलेलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही,’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे गटनेते असणाऱ्या अजित पवारांच्या मदतीने भाजपाने शनिवारी रात्री सत्तास्थापनेचा दावा करुन सकाळी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीने अजित पवारांची विधीमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर अजित पवारांच्या जागी पक्षाने जयंत पाटील यांची विधीमंडळ नेतेपदी निवड केली. या सर्व गोंधळानंतर पाटील यांनी ट्विटवरुन भाजपाला टोला लगावला आहे. भाजपा शरद पवारांना राजकारणामध्ये हरवण्याचा प्रयत्न करत असून ते अशक्य असल्याचं पाटील यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. “शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील,” असं ट्विट पाटील यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्वत:चा शरद पवारांबरोबरचा हसणारा फोटोही पोस्ट केला आहे.

या ट्विटनंतर आज सकाळीही जयंत पाटील यांनी अजित पवार आणि फडणवीस यांच्या भेटीवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री उशीरा ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. याच भेटीवर टीका करताना, “उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढं मोठं हे मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे त्या दोघांशिवाय एकमेकांना भेटायला त्यांच्याकडे कुणीच नाही, म्हणून ते दोघच एकमेकांना भेटणार. त्यामुळे त्या दोघांनी काय चर्चा केली, हे बाहेर माहिती नाही. तुम्ही दोघंच आहात, अद्याप मंत्री केलेले नाहीत, तर खातं कुणाला वाटणार? त्यामुळे हा सर्व प्रकार हास्यस्पद सुरू आहे. रात्री तयार झालेलं सरकार हे रात्रीच कधीतरी जाईल. याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही,” असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.