राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सर्वच पक्षांना सत्तास्थापनेत अपयश आल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी शिवसेना किंवा भाजपा यापैकी कोणत्याही पक्षाकडून युती तुटल्याची घोषणा करण्यात आली नाही. परंतु याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र टोला लगावला. युतीचा पोपट मेलाय, परंतु हे जाहीर कोणी करावं हा प्रश्न शिल्लक असल्याचं ते म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. त्यानंतर सत्तास्थापनेपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. यावेळीही दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. परंतु मुख्यमंत्रिपदाचं वाटप आणि सत्तास्थापनेतील समसमान वाट्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच राज्यातील सत्तास्थापनेतील तिढा अजूनही सुटलेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातून अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. तसंच त्यावेळी एनडीएतून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना तुम्हाला जो अर्थ लावायचा तो लावा असं सांगत त्यांनी बगल दिली होती. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील युतीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळलं.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र टोला लगावला. युतीचा पोपट मेलाय, परंतु हे जाहीर कोणी करावं हा प्रश्न शिल्लक असल्याचं ते म्हणाले. आम्ही शिवसेनेला कोणतीही अट घातली नव्हती. पहिल्यापासून आमची भूमिका विरोधीपक्षातच बसण्याची होती. मात्र, राज्यातील परिस्थिती पाहता शिवसेनेकडून प्रस्ताव आला. त्यानंतर आमच्यात चर्चेला सुरूवात झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकवाक्यता असून किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यात येत आहे. यानंतर शिवसेनेशी चर्चा केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.