आरे वसाहत वन म्हणून जाहीर करण्याची तसेच आरेतील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेसाठी २६४६ झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध ठरवून रद्द करण्याची पर्यावरणवादींची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्यामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर आता सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पडणारं प्रत्येक झाड हे त्यांचा एक आमदार पाडेल आणि याची जाणीव सरकारला झाली पाहिजे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे.

“आरेमध्ये कापण्यात येणारं प्रत्येक झाड आपला आमदार पाडेल याची जाणीव सरकारला व्हायला हवी. ती जाणीव झाल्यानंतर त्यांनी झाडं पाडण्याची हिंमत होणार नाही. काही महिन्यापूर्वी काही जण आरेला कारे करत होते. परंतु आता सर्वजण झोपा रे करत आहेत. परंतु आरेमध्ये झाडं तोडायला सुरूवात झाली. कोणी झाडांना मिठ्या मारणार होते. कोणी झाड तोडू देणार नव्हते, ते सर्व आहेत कुठे?” असा सवाल अव्हाड यांनी केला.

“आरे हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. इतर जमिनी असतानाही आरेचाच अट्टहास का?” असंही ते म्हणाले. “ही झाडं कापून मुंबईच्या प्रदुषणात भर पडेल, पुढच्या पिढीचं आयुष्यही यामुळे खराब होणार आहे. यामध्ये जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. एकाने आरे पाडणार असं म्हटलं तर एक आरे पाडू देणार नाही असं म्हणतो. पण दोघंही काय एक झाले आणि आज आदेश आलाय तोडा रे. प्रत्येक झाड आपला एक आमदार पाडेल याची त्यांना जाणीव झाली पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.