शिवसेना आमदाराला भाजपाने ५० कोटीची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपा आता घोडेबाजार चालवत आहे असंही त्यांनी म्हटलं. फक्त शिवसेनेच्याच नाही तर काँग्रेस पक्षाच्या आमदारालाही ऑफर देण्यात आली असाही आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला लगावला आहे.

राज्यातील विधानसभेचे निकाल लागल्यानंतर दोन आठवड्यांनंतरही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यातच आज (८ नोव्हेंबर) रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यात राष्ट्रपती लागवत लागू होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच राज्यामध्ये फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या भितीने सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हवल्याचे वृत्त समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी भाजपाकडून शिवसेना तसेच काँग्रेस आमदाराला ५० कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. मात्र हिरामण खोसकर या काँग्रेस आमदाराने मला कोणतीही ऑफर आली नाही असं म्हणत विजय वडेट्टीवार यांचा दावा फेटाळला आहे. याच मुद्द्यावरुन आव्हाडांनी ट्विटवरुन टोला लगावला आहे. “मी फोनची वाट बघतोय कुणी फोन करतच नाही,” असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ५० कोटी हा हॅशटॅगही वापरला आहे.

भाजपाने एकदा समोर येऊन सांगावं की…

भाजपाकडून राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव सुरु आहे असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला. “आमचे आमदार फुटणार नाहीत याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीच्यापूर्वी भाजपाने फोडाफोडी केली मात्र जनतेने हे सहन केले नाही. भाजपा जनतेशी बेईमानी करते आहे. भाजपाला महाराष्ट्र माफ करणार नाही. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात आली तर ते पाप भाजपाचं असेल यात काहीही शंका नाही असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. भाजपाने एकदा समोर येऊन सांगावं की आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही. दुसऱ्यांना संधी द्या. स्वतः सरकार स्थापन करायचं नाही आणि दुसऱ्याला संधी द्यायची नाही असं भाजपाचं राजकारण सुरु आहे,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.