विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना होत आल्यानंतर सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या पक्षांचं मिळून महाविकासआघाडी सरकार राज्यात येणार असल्याचं तिन्ही पक्षांचे नेते सांगत आहे. दरम्यान, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांना टोला लगावला आहे.

सरकार स्थापन करण्यासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक निकालात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, शिवसेनेसोबत बिनसल्यानं भाजपाला सत्तेपासून दूर राहावं लागलं. भाजपानं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बोलणी सुरू झाली. आता सरकार स्थापन करण्यासंदर्भात तिन्ही पक्षाचं एकमत झालं असून, समान कार्यक्रम मसुदाही तयार झाला आहे. तिन्ही पक्ष सत्तास्थापनेचा दावा कधी करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं असताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यात सर्वाधिक जागा मिळूनही भाजपा सत्तेबाहेर झाल्याच्या मुद्यावरून भाजपाध्यक्ष अमित शाह यांना डिवचल आहे. “अखेर भारतीय राजकारणातील तथाकथित चाणक्याला शरद पवार यांनी माद दिलीच. दिल्लीच तख्त महाराष्ट्राला झुकवू शकलं नाही,” अशी कोपरखळी मलिक यांनी ट्विटरवरून लगावली आहे.

असा ठरला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला-

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार आहेत. २१ तारखेला निवडणूक पार पडली आणि २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. मात्र शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच आमच्यापुढे पर्याय खुले असल्याची भूमिका घेतली. ज्यामुळे सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. त्यानंतर सुमारे १९ दिवसांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता शिवसेना आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. दर ४ आमदारांमागे १ मंत्रिपद अशी अट काँग्रेसने ठेवल्याची माहितीही सूत्रांनी दिली. शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा विधानसभा निवडणुकीच्या निकालात मिळाल्या. आता आघाडीसोबत शिवसेनेने हातमिळवणी केल्याने मंत्रिपदांचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.