निवडणुकांच्या कालावधीत सर्वच पक्षांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेण्यास सुरूवात केली आहे. कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार करतोय, तर कोणी त्याचा वापर आपल्या विरोधी पक्षावर हल्लाबोल करण्यासाठी करतोय. असाच एका नवा प्रचाराचा फंडा राष्ट्रवादी काँग्रेसने शोधला आहे. सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मराठी रॅपर तरूणांची मदत घेतली आहे. तसंच या रॅपच्या माध्यमातून सरकार राज्य करतंय पण बेरोजगार तरूणांनी पोट कसं भरायचं असा सवाल केला आहे.

इतर पक्षांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेण्यास सुरूवात केली आहे. राज्य सरकारवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं एक नवं मराठी रॅप तयार केलं आहे. विकासाच्या नावाखाली राज्य तुम्ही करायचं, आणि सांगा आम्ही बेरोजगार तरुणांनी पोट कसं भरायचं? असा सवाल काही तरूण या रॅपच्या माध्यमातून करताना दाखवण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील तरुणाईचे आक्रंदन रॅपच्या माध्यमातून असं याला कॅप्शनही देण्यात आलं आहे. तसंच नोटबंदीवरही या गाण्यातून सरकारवर निशाणा साधण्यात आला असून अब की बार असं सारखं म्हणत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचंही तरूण या गाण्यात म्हणत आहेत. तसंच या माध्यमातून सरकारला अनेक प्रश्न करण्यात आले आहेत. तसंच या व्हिडीओच्या सोबतच #IamwithSharadPawar #मीसाहेबांसोबत असे हॅशटॅगही देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त या व्हिडीओला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टॅग करण्यात आलंय. यापूर्वी विरोधी पक्षांना घेरण्यासाठी भाजपानेही रम्याचे डोस ही व्यंगचित्र मालिका सुरू केली आहे.