राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा अनेक विषयांवरून सरकारला धारेवर धरलं. महाराज आमचा तुम्हाला विरोध नाही. महाराष्ट्राच्या छातीवर बेरोजगारीचा वरवंटा फिरवणारे, तसेच शेतकरी आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांना विरोध केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेदरम्यान त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.

साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघात आयोजित प्रचारसभेदरम्यान अमोल कोल्हे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांच्यावरही टीका केली. उदयनराजे हे एक उमदं व्यक्तीमत्त्व आहे. दिल्लीच्या तत्कातालाही छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळे दाखवले होते. त्यासमोर महाराष्ट्राची मान झुकू नये ही भावना उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबाबत होती, असं कोल्हे यावेळी म्हणाले. परंतु जे शेतकरी आत्हमत्येस कारणीभूत आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या छातीवर वरवंटा फिरवसला आहे, त्या भाजपा सरकारला आम्ही विरोध केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचंही ते म्हणाले.

यापूर्वी झालेल्या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. गेल्या पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता कुणावर गुन्हा दाखल करायचा, असा सवाल राष्ट्रवादी त्यांनी बेलवंडी येथे आयोजित केलेल्या सभेत केला होता.