काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला. दरम्यान राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना वाद दीराशी आहे तर मग नवरा कशाला सोडायचा? असा टोला लगावला आहे. औरंगाबादमधील एमजीएम महाविद्यालयात सुप्रिया सुळे बोलत होत्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी, “हर्षवर्धन पाटील यांचं भाषण ऐकून आपण अनेक वेळा त्यांना फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही,” अशी माहिती दिली. पुढे बोलताना त्यांनी आपली राहुल गांधी आणि हर्षवर्धन पाटील यांची कधीच भेट झाली नसल्याचं सांगितलं. भाजपा पक्षप्रवेशावर बोलताना भांडण दीराशी आणि नवरा कशाला सोडता असा टोलाही त्यांनीही लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये अलिबाबा आणि ४० चोर असं म्हटलं होतं. पण आता त्यातील अनेकजण आपल्या पक्षात घेतले आहेत असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.

हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच एक मेळावा घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसंच त्याच मेळाव्यात त्यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर टीका केली. हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसच्या कार्यकाळात मंत्री होते. मात्र त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील आधी भाजपात आले असते तर एव्हाना खासदार झाले असते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

“हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा अनुभवी नेता भाजपात आल्याने भाजपाचं बळ वाढेल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर, “पाच वर्षांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची वाट बघत होतो. संसदीय कार्यमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी प्रदीर्घ काळ काम केलं. सर्वांना सोबत घेण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे त्याचा उपयोग आम्हाला निश्चितपणे होईल. त्यांच्या गाठीशी जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा भाजपाला आणि युती सरकारला मिळेल ” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.