सत्तेची चटक लागल्यानेच भास्कर जाधव शिवसेनेत गेले आहेत. परंतु येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा पराभव करून याचा बदला घेईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

“भास्कर जाधव हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. ते शिवसेनेत असताना त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच पराभव केला होता. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत आले. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. विधानसभा देण्यात आली. मंत्री करण्यात आले. परंतु आता ते सत्तेसाठी शिवसेनेत गेले आहेत,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. “येत्या निवडणुकीत त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस दमदार उमेदवार देईल आणि त्यांचा पराभव करेल,” असा विश्वासही नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

मोदी – फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत डंका पिटत आहेत
देशात मोदी आणि राज्यात फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत विकासकामांचा डंका पिटत असल्याची जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली आहे. निवडणुका जवळ आल्यावर केंद्र व राज्य सरकार मोठमोठया जाहिराती आणि विकासकामांची उद्घाटने करत आहे आणि विकास आम्हीच करत आहे असे सांगत आहे याचा जोरदार समाचार नवाब मलिक यांनी घेतला.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक विकासकामे केली जात असल्याचा दावा केला आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले.

“पियुष गोयल हे मुंबईचे आहेत. पावसामध्ये रेल्वेची काय हालत झाली होती याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. पियुष गोयल महाराष्ट्रात ४० टक्के विकास होत असल्याचे बोलत आहेत. परंतु ट्विटर, सोशल मिडिया यावरुन सरकार किंवा व्यवस्था चालवली जात नाही हे लक्षात घ्या,” असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.