राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला. अशातच राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात कोणत्याही पक्षाला यश आलं नाही. त्यातच राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांचा धडाकाच लावला आहे. तसंच ट्विटरच्या माध्यमातूनही शेर शेअर करत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी संजय राऊत यांच्या एका ट्विटवर राहत इंदौरी यांच्या काही पंक्ती लिहित रिट्विट केलं आहे.

दोन दिवसांपूर्वी राऊत यांनी हबीब जालिब यांचा एक शेर ट्विट केला होता. तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था; उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं. त्यावर नवाब मलिक यांनी राहत इंदौरी यांचा शेर रिट्विट केला आहे. ‘जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे, किराएदार हैं ज़ाती मकान थोड़ी है’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच नवाब मलिक यांनी यापूर्वीही शिवसेनेचा सन्मान करणं ही आमची जबाबदारी आहे, असं म्हटलं होते. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राष्ट्रपती राजवट हटणार नाही. तो निर्णय करण्यासाठीच चर्चा सुरू आहे. शिवसेनेचा सन्मान टिकवून ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्रिपादावरून आमच्यामध्ये भांडणं होणार नाहीत, असंही ते म्हणाले होते.