साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशावर राष्ट्रवादी नेत्यांनी टीका केली असून नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही उदयनराजे भोसले यांच्या निर्णयावर टीका करताना जरी ते पक्ष सोडून गेले असले तरी ती जागा आम्ही निवडून आणू असा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करताना उदयनराजे दिवसा आणि रात्री कुठल्या अवस्थेत असतात हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला लगावला. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

उदयनराजेंमुळे पक्षाला नेहमी अडचणींचा सामना करावा लागत होता. पवार साहेबांनी त्यांना वारंवार संधी दिली. पण अडचणीच्या काळात त्यांनी साहेबांची साथ सोडली असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.

उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतराबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले, “१९९९ च्या आधी उदयनराजे भाजपाचे आमदार आणि मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना हरवलं होतं. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईंच्या मध्यस्थीमुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दरवेळी त्यांना तिकीट देत असत. मात्र राष्ट्रवादीमध्ये असूनही ते कायमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातली भूमिका घेत असत. साताऱ्यात पुन्हा एकदा उदयनराजेंचा पराभव करु इतकंच नाही तर सातारा विधानसभेच्याही जागा जिंकू.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nawab malik udyanraje bhosale bjp sgy
First published on: 16-09-2019 at 15:55 IST