“आज मला महाराष्ट्राची काळजी वाटते. महाराष्ट्रातील जनतेनं मला खुप काही दिलं. 4 वेळा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती सोपवली, केंद्रातही नेतृत्व करण्याची संधी दिली. गेली 52 वर्ष मला संधी दिली. त्यामुळे मी राज्यातील जनतेचं काही देणं लागतो. अशा वेळी आज राज्य अडचणीत आहे. राज्यातील शेती, उद्योग अडचणीत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत ज्या राज्याने आपल्याला इतकी शक्ती दिली त्या राज्याचं सध्याचं चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसंच यासाठी मी कष्ट करत असल्याचं ते म्हणाले.

शरद पवार यांनी राज्यातील बेरोजगारी, शेती व्यवसाय, पक्षातील दिग्गजांनी पक्षाची साथ सोडणं अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. “मध्यंतरीच्या काळात अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. परंतु यातून मला नवं नेतृत्व तयार करण्याची संधी मिळाली. सुदैवानं तालुक्यात असेल गावागावांमध्ये असेल तरूणांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. नव्या नेतृत्वाला उत्साहित करण्याची जबाबदारी जर मी घेतली तर ते अधिक उत्साहानं काम करतील. त्यांच्या कामावर विश्वास आहेच. परंतु त्यांना प्रोत्साहित करावं, यासाठी मी सहभाग घेत आहे,” असं शरद पवार यावेळी म्हणाले.

“गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक विषय उचलून धरले. तसंच आक्रमक भूमिकाही घेतल्या. या सर्वांचे सकारात्मक परिणाम या निवडणुकांमध्ये दिसतील. साधन संपत्ती या गोष्टींमध्ये विद्यमान सरकार हे प्रचंड शक्तीशाली आहे. तर विरोधक या सर्व गोष्टींच्या बाबतीत अडचणीत आहेत. जे लोक आम्हाला मदत करतात त्यांच्यात आज दहशत पसरली आहे. त्यांना बोलायचं असलं तरी त्यांची तयारी नसते. ईडी, सीबीआयचा सातत्यानं वापर करून दहशतीचं वातावरण तयार करण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे आम्हाला मदत करणारी लोकंही दूर जात आहेत,” असं ते यावेळी म्हणाले.