News Flash

“मुख्यमंत्रिपद हवं असल्यास आमच्यासोबत या”

'या' नेत्यानं दिली शिवसेनेला खुली ऑफर

विधानसभा निवडणुकीचे निकाल आता लागले आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्रिपदासाठीही आता रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी निकालानंतर पत्रकार परिषद घेतली. जागावाटपाच्या वेळी वाटाघाटी केल्या परंतु आता प्रत्येक वेळी अडचण समजून घेणार नसल्याचं सांगत अप्रत्यक्षरित्या उद्धव यांनी भाजपाला इशारा दिला. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर देत भाजपासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार का आपल्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार असं म्हटलं.

शिवसेनेने भाजपासोबत राहून उपमुख्यमंत्रिपद घ्यायचं का आमच्या सोबत येऊन मुख्यमंत्रिपद घ्यायचं हे आता शिवसेनेनेच ठरवावं, असं भुजबळ यांनी नमूद केलं. भाजपबरोबर जागावाटपाचे सूत्र आधीच ठरले होते. पण भाजपची अडचण समजून घ्या, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने कमी जागांचा प्रस्ताव मान्य केला. प्रत्येक वेळी भाजपच्या अडचणी समजून घेता येणार नाहीत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये शिवसेनेला निम्मा वाटा हवा, असे स्पष्ट केले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, असे विचारता ‘तुमच्या तोंडात साखर पडो’, अशी ‘मार्मिक’ टिप्पणी ठाकरे यांनी केली. समान सत्तावाटपाचे सूत्र पारदर्शकपणे ठरल्यानंतरच सरकार स्थापनेचा दावा महायुतीकडून केला जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या आधी युती करताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जागावाटपात निम्म्या जागा आणि सत्तेचे समान वाटप असेच सूत्र ठरले होते. पण निम्म्या जागा देण्यात भाजपपुढे अडचणी असल्याने तडजोड करण्याची विनंती पाटील यांनी केली होती. पण आता मी भाजपच्या अडचणींचा प्रत्येक वेळी विचार करू शकत नाही. माझ्या पक्षाच्या वाढीकडे पाहिले पाहिजे, असे ठाकरे यांनी स्पष्ट करीत मुख्यमंत्रिपदाचेही समसमान वाटप व्हावे, असेच संकेत दिले. मला सत्तेची हाव नाही, त्यामुळे मी वेडेवाकडे काही करणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. जनतेला गृहीत धरून काही लोक चालायला लागतात, तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर ठेवण्याचे काम जनता करते. सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यात जनतेने या निकालातून झणझणीत अंजन घातले आहे. डोळे चुरचुरत असताना मुख्यमंत्रिपदावरून भांडत राहिल्यास जनता आणखी कठोर उपाय करेल, असे ठाकरे यांनी सुनावले. काही चुका झाल्या असतील, तर त्या सुधारल्या जातील, असे सांगून आदित्य ठाकरे यांच्या विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 8:11 am

Web Title: ncp senior leader chagan bhujbal offers shiv sena chief minister post uddha thackeray maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 मंत्री पंकजा मुंडे व जयदत्त क्षीरसागरांचा दारुण पराभव
2 लातूर ग्रामीणमध्ये ‘नोटा’चा विक्रम २६ हजार ८९९ ‘नोटा’चे मतदान
3 वर्धा जिल्हय़ात भाजपला शंभर टक्के यश
Just Now!
X