राज्यात निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. त्यातच सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. १०५ जागांवर विजय मिळवत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय परिस्थिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. परंतु शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल,” अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

“शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवं आहे की उपमुख्यमंत्रिपद याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा. तसंच शिवसेनेने हिंमत करून सत्तास्थापनेचा दावा करावा,” असं भुजबळ म्हणाले. “जनतेनं आम्हाला विरोधीपक्षात बसण्याचा कौल दिला आहे, हे यापूर्वीच शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद यापैकी काय हवं ते त्यांनी आधी ठरवलं पाहिजे. जर सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने प्रस्ताव पाठवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा नक्कीच सकारात्मक विचार करेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- शिवसेना आमदाराला भाजपाकडून ५० कोटींची ऑफर : विजय वडेट्टीवार

“राज्यपालांशी चर्चा करताना आम्ही राज्यातील शेतकरी अडचणीत सापडल्याची माहिती त्यांना दिली. तसंच सरकार नसल्यानं राज्यात निर्णय घेण्यासाठी अडचणी येत असल्याचंही सांगितल्याचं ते म्हणाले. राज्यात राष्ट्रपती राजवट जरी लागू झाली तरी ती फार काळ राहणार नाही. येत्या १५ दिवसांमध्ये नवं सरकार अस्थित्वात येईल,” असं सूचक वक्तव्यही भुजबळ यांनी केलं.