राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करत भाजपासोबत जाऊन हातमिळवणी करणाऱ्या अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून सुरु आहे. छगन भुजबळ यांनी सकाळी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी मात्र आपण अजित पवारांच्या अजिबात संपर्कात नसल्याचं सांगत याबद्दल काहीच सांगू शकत नसल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांनी साताऱ्यात प्रीतीसंगमावर यंशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी शरद पवार यांना अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परततील का? असं विचारण्यात आलं असता, मी कोणाच्याही संपर्कात नसल्याने मला काही माहिती नाही असं त्यांनी सांगितलं. अजित पवारांची हकालपट्टी करायची की नाही हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नसून, पक्ष निर्णय घेईल असंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं.

एखाद्याचं मत वेगळं असू शकतं
“एखाद्या व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं. हे मत पक्षाच्या बैठकीत मांडल्यानंतर त्यादृष्टीने वेगळी पाऊलं टाकली जाऊ शकतात. पण असे निर्णय व्यक्तिगत नसतात तर पक्षाचे असतात,” असं सांगत शरद पवार यांचा निर्णय़ वैयक्तिक असून राष्ट्रवादी पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे.

केंद्रातील सत्ता, राज्यपाल यांचा गैरवापर
यावेळी बोलताना शरद पवार यांनी, “बहुमत नसतानाही भाजपानं सरकार बनवलं, केंद्रातील सत्ता, राज्यपाल याचा गैरवापर करण्यात आला,” असल्याचा आरोप केला. पक्ष म्हणून राष्ट्रावादी सरकारमध्ये सामील नाही. हा पक्षाचा निर्णय नाही, त्याच्याशी आम्ही सहमत नाही असं यावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. “ही निवड वैध आहे की नाही हा खरा प्रश्न असून राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान झाल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील,” असंही यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

अशा संकटांमधून मार्ग निघत असतो
“अशा अनेक गोष्टी मी गेल्या ५० ते ५२ वर्षात पाहिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनता या अशा प्रसंगी भक्कम उभी राहते हा माझा गेल्या वर्षांपासून अनुभव. मला यासंबंधी चिंता वाटत नाही, अशा संकटांमधून मार्ग निघत असतो,” असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला. या सगळ्यामागे शरद पवारांचा हात असल्याची चर्चा असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. “आम्ही सगळे पक्षासाठी काम करणारे नेते, कार्यकर्ते आहोत. त्यासाठी जे कष्ट करावे लागतील ते आम्ही करु. आमच्याकडे नेत्यांची मोठी फळी आहे. माझ्या सूचनेचा पक्षात अनादर होणार नाही याची खात्री आहे,” असं त्यांनी सांगितलं.