राज्य सरकार इतिहास बदलण्याचे काम करीत आहे. या सरकारने कोणतेही आश्वासन पाळले नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. तर काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पवार आणि मी एकत्र येऊन कोणाला फेकून देऊ ते कळणार नाही असे सूचक विधान केले. पंढरपूर येथे जाहीर सभेत ते बोलत होते. दरम्यान या सभेत भाजपाचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्यावर दोघांनी टीका करण्याचे टाळले.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. सुशीलकुमार शिंदे यांनी आटोपशीर भाषणात सुरुवातीला भालके यांना चिमटे काढले. “या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. त्याला निलंबित केले असून आघाडीचे उमेदवार भालके आहेत,” असे शिंदे यांनी जाहीर केले. “तर पवार साहेब आणि मी एकत्र येऊन कोणालाही फेकून देवू असे सूचक विधान केले. त्या नंतर शरद पवार यांनी भाषणाची सुरुवातच “आमचं ठरलय” असे सांगत केली.

“राज्य सरकारने पाच वर्षात काय केले? स्मारक बांधू असे आश्वासन दिले. स्मारके बांधली नाहीत. गड किल्ल्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे. पण या सरकारने किल्ल्यावर वेगळेच करायचे ठरवले. चौथीच्या पुस्तकातून इतिहास बदलला. नवीन पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजला पाहिजे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

“राज्यातला शेतकरी संकटात आहे. कारखानदारी बंद पडायला लागली. त्यामुळे हे सरकार उलथून टाकू,” असे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, पवार आणि शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी सुधाकर परिचारक हे भाजपाचे उमेदवार आहेत. मात्र या दोघांनी परिचारक यांच्यावर कोणतीही टीका केली नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

तुमची ईडी असो वा काही.. तिला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही
“आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. हे गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्याविरोधात जे बोलतात त्यांच्यावरच ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही.. तिला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असं सांगत शरद पवार यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली.