लोकसत्ता ऑनलाइन, वर्धा

विधानसभा निवडणूकीत पक्षनेत्यांच्या भूमिकेमूळे निर्माण झालेले संशयाचे वातावरण दूर करण्यास पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा दौरा उपयुक्त ठरणार काय, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पक्षाचे हिंगणघाट येथील उमेदवार राजू तिमांडे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज हिंगणघाटला येत आहे. येथील गोकुलधाम मैदानावर त्यांची जाहिर सभा आयोजित असून जिल्हय़ातील त्यांची ही एकमेव सभा असल्याने बंडखोरांना इशारा मिळण्याची शक्यता व्यक्त होते.

पक्षाचे जेष्ठनेते अॅड. सुधीर कोठारी यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला होता. परंतू अजित पवार यांच्या सुचनेने तो परत घेतला. अर्ज परत घेतल्यानंतर आपल्या गटाचा पाठिंबा त्यांनी जाहिर केलेला नाही. या बाबतीत लवकरच निर्णय घेणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. या विधानसभा मतदारसंघात पक्षाचे माजी आमदार राजू तिमांडे व सुधीर कोठारी यांचे निर्विवाद वर्चस्व राहले. परंतू या दोघात फाटल्याने पक्षाची शक्ती विखूरली. दोघांनीही पक्षाकडे लढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र जिल्हय़ातील जातीय समीकरणावर तसेच विदर्भात सर्वाना सामावून घेण्याची भूमिका दाखविण्यासाठी राजू तिमांडे यांनाच तिकिट मिळाले.

मात्र ही बाब खटकलेल्या कोठारी यांनी उघडपणे तिमांडे विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली. समुद्रपूर व हिंगणघाट बाजार समिती, वणा बँकेचे जाळे, ग्रामीण भागातील सहकारी संस्था एकहाती ठेवणाऱ्या व माजी नगराध्यक्ष असलेल्या कोठारींची ताकद पक्षासाठी महत्वाची आहे. त्यांची नाराजी तिमांडेंना अडचणीत आणू शकते. मात्र असे असूनही स्वत: तिमांडे यांनी कोठारींना मदतीचे साकडे न घालता फटकून वागण्याची भूमिका ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची उपस्थिती मनोमिलन घडवू शकते काय, ही बाब उत्सूकतेची ठरली आहे. पक्षाचे जिल्हय़ाचे सर्वेसर्वा प्रा. सुरेश देशमुख यांच्यापूढेही प्रश्नचिन्ह आहे. त्यांचे पूत्र समीर देशमुख यांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर सेनेत प्रवेश करून देवळीतून उमेदवारी खेचली. परिणामी एकाच घरात दोन पक्षाचे झेंडे लागले. पूत्र समीरच्या उमेदवारीवर पित्याचा नव्हे तर त्याच्या सासुरवाडीचा शिक्का असल्याचे पक्षनेते सांगतात व सुरेश देशमुखांवरील किटाळ दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी वर्ध्यातील काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांना सहकार्य करण्याची भूमिका उघडपणे घेतल्याचे दिसून येते. त्यांना पवारांच्या व्यासपिठावर स्थान मिळणार काय, असाही प्रश्न उपस्थित केला जातो. आर्वी मतदारसंघात पक्षनेते दिलीप काळेंचे पूत्र संदीप काळे यांनी उघडपणे भाजपच्या प्रचारात उडी घेतली आहे. तर दिलीप काळे यांनी आघाडी धर्म बाजूला ठेवून मौन बाळगणे पसंद केले. पक्षनेते एकीकडे तर त्यांचे पूत्र दुसरीकडे अशी स्थिती राकाँमध्ये दिसून येत असल्याने सर्वत्र संशयाचे वातावरण आहे. पक्षाचा एकमेव उमेदवार असलेल्या हिंगणघाटमध्ये काँग्रेस गलीतगात्रच आहे. म्हणून तिमांडेंना स्वपक्षीय नेत्यांचीच अधिक गरज असल्याचे म्हटल्या जाते. उर्वरित तीन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी पक्षनेते पवार जाहीर भाषणातून टिपणी करतील, असे बोलले जात आहे.