‘शिवाजी महाराजांच्या विचारांचे संस्कार लहान मुलांना शालेय पुस्तकातून मिळत होते ते दूर करण्याचं पाप भाजपा-शिवसेना सरकारनं केलं आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास वगळण्यात आल्याचे वृत्त समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी ही टीका केली आहे. तर जयंत पाटील यांनाही ट्विटवरुन या निर्णयावर आक्षेप नोंदवताना ‘महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्या स्वाभिमानाची भवानी तलवार अजून म्यान केलेली नाही. आपल्या आराध्य दैवताच्या या अपमानाचे उत्तर लवकरच ते आपल्याला देतील,’ असे मत व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या प्रकरणावर मत व्यक्त करताना कोल्हे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चौथीच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून हद्दपार करण्याचा घाट भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारने घातला आहे,’ अशी टीका कोल्हे यांनी केली आहे. महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय असो किंवा महाराजांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारकाला होणारा विरोध असो किंवा आताचा चौथीच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय असो हे सर्व निर्णय धक्कादायक आहेत असं मत कोल्हे यांनी व्यक्त केले आहे. ‘२०१४ मध्ये याच भाजपा शिवसेनेने छत्रपती शिवाजींचा आशिर्वाद मागितला होता तो याच कामांसाठी मागितला होता का? असा प्रश्न मला पडतो,’ असंही कोल्हे म्हणाले आहेत. ‘चौथीच्या पुस्तकातून लहान वयातच मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे जे संस्कार मिळत होते ते दूर करण्याचं पाप या सरकारनं केलं आहे. या कृत्याचा निषेध करावा तितका कमी आहे,’ अशा शब्दांमध्ये कोल्हे यांनी या निर्णयाला आपला विरोध असल्याचे सांगितले.

काय आहे हे प्रकरण

शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवायला आहे. राज्यातील शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने ‘स्थानिक’ भाषा माध्यमातील शाळांना शिक्षण विभागाने ‘आंतरराष्ट्रीय’ असे बिरूद चिकटवले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळही सुरू केले. गेल्यावर्षी पुस्तकांविनाच चालणाऱ्या या शाळांसाठी यंदा पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली. या पुस्तकांमधून शिवाजी महाराजांचा इतिहास वगळण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

पुस्तकात काय?

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या वेगळ्या पैलूंची ओळख तर सोडाच पण आतापर्यंत राज्यमंडळाच्या पुस्तकांत गोष्टीरुपात मांडण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया याचाही समावेश केलेला दिसत नाही. केवळ भारतीय लोक या घटकांत शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची त्रोटक माहिती आहे.

झाले काय?

राज्यमंडळाच्या शाळांमध्ये गेली पन्नासहून अधिक वर्षे चौथीच्या पाठय़पुस्तकांतील अविभाज्य भाग असलेला शिवाजी महाराजांचा इतिहास आंतराराष्ट्रीय मंडळाच्या पाठय़पुस्तकांतून वगळण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या तत्वांचे राज्य निर्माण करण्याचा प्रचार सध्या सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू आहे. तरी नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने फारशी तसदी घेतलेली दिसत नाही.