‘पवार काय बोलले याचा अभ्यास न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत. ते किती खोटारडे आहेत हे आज सिद्ध झाले आहे,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाशिक येथील सभेत मोदींनी आज टीका केली त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे.

पवारसाहेबांना पाकिस्तानचे शासक प्रशासक चांगले वाटतात ही देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला. ‘पवार यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट सांगितले होते की, पाकिस्तानमधील राज्यकर्ते आणि सैन्यदल यांची भूमिका भारतविरोधी आहे. मात्र तेथील जनता तशी नाही. परंतु त्याचा खोटा प्रचार मोदी व फडणवीस करत आहेत’ असेही मलिक म्हणाले.

‘तुमच्याकडे संपुर्ण यंत्रणा आहे. तुम्ही पुर्ण व्हिडिओ बघा. पवार तुम्ही म्हणता तसं बोलले असतील तर आम्हाला दाखवा. आम्ही राजकारण सोडून देवू आणि तसे नसेल तर पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी,’ अशी मागणी मलिक यांनी केली. ‘पाकिस्तानातील शासक प्रशासक आम्हाला चांगले वाटत नाही तर ते मोदींना चांगले वाटतात म्हणून तर ते नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेले होते. मग इतरांवर आरोप मोदी का करतात’, असा सवालही मलिक यांनी केला.

भाषणात काय म्हणाले मोदी

महाजनादेश यात्रेची समारोप सभा नाशिकमधील पंचवटीतील तपोवनात पार पडली. यासभेमध्ये मोदींनी पवारांवर टीका केली. ‘शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील प्रशासन त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात?,’ असे सवाल मोदींनी उपस्थित केले.