निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधकांवर हल्लाबोल करण्यासाठी भाजपाने रम्याचे डोस सुरू केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीनंही भाजपावर निशाणा साधला आहे. कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपानं निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या ट्विटर हँडलवरून मराठी म्हणीचे नवे अर्थ या मथळ्याखाली एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधत ते पाटील जे करत आहेत ते म्हणजे आयत्या बिळावर चंदूबा असल्याचं म्हटलं आहे.

कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना यावेळी डावलण्यात आलं असून त्यांच्या ऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. सुरूवातीला त्यांना या मतदारसंघातून विरोधालाही सामोरं जावं लागलं होतं. तसंच अनेकांनी स्थानिक उमेदवार देण्याचीही मागणी केली होती. यानंतर त्यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेला पाठिंबा जाहीर केला होता. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही चंद्रकांत पाटील यांना चंपा म्हणत त्यांची फिरकी घेतली होती. निवडणुकीत आमचा अजय ‘चंपा’ ची चंपी करणार असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. कोल्हापूर सांगली या दोन शहरांमध्ये पूर आला आणि सरकारमधला मंत्री वाहून कोथरुडमध्ये आला असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. एवढंच नाही तर ‘चंपा’ हे नाव पुणेकरांनी चंद्रकांत पाटील यांनी ठेवलं हे कळल्यावर पुणेकर नावं ठेवण्यात पटाईत असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

त्यानंतर यावर चंद्रकांत पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. मला अजित पवार यांनी ‘चंपा’ म्हटले, त्यावर राज्यात चर्चा झाली. ही चर्चा थांबत नाही तोच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील चंपा म्हटले. असो, पण राज ठाकरे यांनी दुसर काही तरी बोलण्याची आवश्यकता होती. माझी आई देखील मला लाडाने ‘चंद्या’ म्हणते, तर हे सर्व विरोधक प्रेमापोटी ‘चंपा’ म्हणतात. अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला होता.