मुख्यमंत्री एवढे मस्तवाल झाले आहेत की त्यांना भाजप आणि निवडणूका या व्यतिरिक्त काही दिसत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसाने हाहाकार उडाला आहे. त्यात आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन झोपलेले आहे. त्यामुळे पुणे आणि नाशिक येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हयातील पूरपरिस्थिती असेल किंवा महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रसंग असेल; सगळ्या वेळी आपत्ती व्यवस्थापन निद्रिस्तावस्थेत होते. ही परिस्थिती हाताळण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आणि पालकमंत्री यांचे आहे. पण हे लोक मात्र दिल्लीत जावून बसले आहेत”, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

दरम्यान, काल रात्रीपासून परतीच्या पावसाने पुणे शहर आणि परिसरामध्ये हाहाकार माजला आहे. शहरात सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी रात्रीपासून वाढला असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या काम करत आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे युतीच्या जागावाटपाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले. त्यावरुन काँग्रेसनेही सरकारवर टीका केली होती.

“सरकारला पूरपरिस्थितीचे गांभीर्य नाही. फडणवीस सरकारला लोकांच्या प्रश्नांशी काहीच देणंघेणं नाही. पुण्यामध्ये पूरात माणसं मरत असताना भाजपाचे मंत्री मात्र निवडणुकीसंदर्भातील कामांमध्ये अडकेलेले आहेत. कोल्हापूर-सांगलीत पूर आला तेव्हा मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढण्यात व्यस्त होते आणि आज पुण्यामध्ये पूर आलेला असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्राकांत पाटील हे युतीच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.