राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी राजकीय पटलावर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली पडद्यामागं सुरू आहेत. मुख्यमंत्रीसाठी भाजपापासून दूर झालेल्या शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. पण, मुख्यमंत्री कोणाचा होणार हा प्रश्नावरून अद्यापही निकाली निघालेला नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र, शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाची मागणी करत भाजपापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानं सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचं राज्यपालांना सांगितलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं वेळ वाढवून मागितला होता. तर राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करण्यास बहुमत नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू आहे. तीनही पक्ष समान सूत्री कार्यक्रमावर चर्चा करत असून, काही दिवसांत सरकार स्थापनेचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच वाटप कसं होणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मलिक म्हणाले, “मुख्यमंत्रीपदामुळेच शिवसेना युतीतून बाजूला झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं, त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उपमुख्यमंत्रीपदाबद्दल अजून काहीही चर्चा झालेली नाही. काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्याची ईच्छा नाही. त्यामुळं मागणी कशी पुढे आली? काँग्रेसची भूमिका बाहेरून सरकार पाठिंबा देण्याची आहे. पण, आम्हाला वाटत त्यांनी सत्तेत यावं. पद, विभाग याबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. येणाऱ्या दिवसात याविषयी चर्चा होईल. त्यात कोणताही वाद होणार नाही,” असं मलिक यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. मलिक यांनी मांडलेल्या भूमिकेमुळं शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाच्या मागणीबद्दल राष्ट्रवादी अनुकूल असल्याचेच दिसून येतं आहे. मात्र, याबद्दल काँग्रेसनं कोणतीही भूमिका मांडलेली नाही. त्यामुळं सत्ता वाटपात काँग्रेस काय मागणी करते याकडं सगळ्याचंच लक्ष लागलं आहे.